सोलापूर, दि. १२ ऑगस्ट : सोलापूरमध्ये गाजत असलेल्या शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व सात आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. ए. कुलकर्णी यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी आरोपी क्रमांक १ अमित सुरवसे आणि आरोपी क्रमांक ६ श्रीकांत सूरपूरे यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदर प्रकरणात विष्णू शिवराया हांडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे फिर्याद दाखल केली होती. त्यात त्यांच्या भावाचे – शरणू हांडे यांचे – अपहरण करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात एकूण सात आरोपींचा समावेश असून त्यातील चार आरोपींना सुरुवातीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी दोन आरोपींना आणि १० ऑगस्ट रोजी उर्वरित एका आरोपीला अटक करण्यात आली.१२ ऑगस्ट रोजी सर्व आरोपी – अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनिल भिमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम, अभिषेक गणेश माने, राकेश भिमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबूराव सूरपूरे आणि समर्थ वासूदेव भैरी – यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी आरोपी क्रमांक १ व ६ बाबत आणखी तपासासाठी, मोबाईल विश्लेषण व हत्यारे तसेच जप्त वस्तूंच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.यावर आरोपींच्या वतीने अॅड. शरद पाटील यांनी न्यायालयासमोर व्यक्तिवाद सादर केला.
अॅड. प्रसाद काशिद, अॅड. श्रीप्रसाद अंकलगी आणि अॅड. अलीनवाज सय्यद यांनी कामकाज पाहिले. अॅड. पाटील यांनी रिमांडमधील कारणे पुन्हा पुन्हा दिली जात असून त्यात काही नवे कारण नसल्याचे न्यायालयासमोर मांडले.
पोलीस कोठडी वाढवण्यास स्पष्ट आणि ठोस कारणे नसल्याने न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद फेटाळून लावत सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.या प्रकरणातील पुढील सुनावणीस सर्वांचे लक्ष लागले असून पोलीस तपास कशा दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Adv Sharad Patil