MH13NEWS Network
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात
डॉ. कोलूर, शुभांगी बुवा, सोमनाथ हुलगे, प्रशांत जोशी यांचा सन्मान
सोलापूर : सहकार महर्षी, स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त उद्या (रविवार, दि. १७ ऑगस्ट) सोलापुरात ‘जीवनगौरव पुरस्कार’ सोहळा मोठ्या दिमाखात होणार आहे. किर्लोस्कर सभागृह येथे दुपारी साडेचार वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात वैद्यकीय, सामाजिक, कृषी व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.

यंदाचे मानकरी म्हणजे डॉ. बसवराज कोलूर (वैद्यकीय क्षेत्र), शुभांगी जयकृष्ण बुवा (सामाजिक क्षेत्र), सोमनाथ हुलगे (कृषी क्षेत्र), तसेच पत्रकार प्रशांत जोशी (पत्रकारिता क्षेत्र). प्रत्येकाला २१,००१ रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ते ‘सहकारापुढील आव्हाने व संधी’ या विषयावर प्रबोधनपर विचार मांडतील.वि. गु. शिवदारे अण्णांनी सहकार, शिक्षण, बँकिंग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात जवळजवळ सहा दशकं कार्य करत सोलापुरात सहकार चळवळीचा पाया रचला. त्यांची जयंती हा पुरस्कार सोहळा म्हणजे तरुणांसाठी प्रेरणा व भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी सांगितले.


पत्रकार परिषदेस नरेंद्र गंभीरे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, सुभाष मुनाळे, प्रमोद बिराजदार, प्रा. भीमाशंकर शेटे, डॉ. बाहुबली दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.