प्रशासनाचा तत्पर निर्णय : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी, कामाला मिळाला वेग
सोलापूर :शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरातील दुरुस्तीचे काम संथ गतीने आणि उघड्यावर सुरू असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. मात्र महापालिकेने तत्परतेने कारवाई करत, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी बुधवारी पत्रकार परिषद संपताच भर पावसात थेट पुतळा परिसरात धाव घेत पाहणी केली आणि संबंधितांना कडक शब्दांत सूचना देत तात्काळ काम गतीमान करण्याचे आदेश दिले.

छत्रपती शिवाजी महाराज हे शहरवासीयांच्या आणि शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय असल्याने दुरुस्तीची गती मंदावल्यामुळे शिवप्रेमी संघटनांकडून नाराजी व्यक्त होत होती.

आंदोलनाचीही शक्यता निर्माण झाली होती.
हा मुद्दा पत्रकारांनी आयुक्तांसमोर मांडताच प्रशासनाने वेळ न दवडता थेट स्थळाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी चबुतऱ्याचे उघड्यावर सुरू असलेले काम थांबवून, तातडीने पडदे लावून आतील बाजूस वेगाने काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाच्या या जलद निर्णयामुळे पुतळा परिसरातील कामाला वेग आला असून, शिवप्रेमी व नागरिकांनीही या तत्परतेचे स्वागत केले आहे.