MH 13 NEWS NETWORK
सोलापूर :
सोलापूर शहरात भाविकांच्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होम मैदानासह नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, मनोज जाधव, सागर करोसेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच नंदी ध्वज मिरवणूक सुरक्षित व सुरळीत पार पडावी, यासाठी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मिरवणूक मार्गावरील अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून उंच नंदी ध्वज व मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये.
तसेच मिरवणूक मार्गावरील लटकणाऱ्या केबल वायर, दूरध्वनी व विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने दुरुस्त अथवा स्थलांतरित करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. यात्रेच्या काळात रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना राहावी यासाठी एलईडी लाईट्स व अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याबाबत तसेच बंद किंवा खराब असलेल्या दिव्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मिरवणूक मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था व आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून भाविक, वाहनचालक व मिरवणुकीतील सहभागी यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
होम मैदान परिसरात होणाऱ्या धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, विद्युत पुरवठा, आरोग्य सुविधा व अग्निशमन यंत्रणेची सज्जता याबाबतही आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
यात्रेच्या कालावधीत स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रेचे नियोजन यशस्वी करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.








