MH13NEWS network
सोलापूर, दि. २९ जुलै – ओंकार हजारे आत्महत्या प्रकरणी नाव आल्याने चर्चेत आलेले सोलापूरचे माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांना फौजदार चावडी पोलिसांनी दिलासा दिला असून, त्यांच्यासह अन्य पाच जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने कोणतीही अट न घालता सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, मयत ओंकार महादेव हजारे याचे स्वाती या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी आळंदीत जाऊन प्रेमविवाह केला होता. घरच्यांच्या नाराजीमुळे ते दोघे पुण्यात राहत होते. ओंकारने कार भाड्याने चालवून उदरनिर्वाह करीत होता, परंतु त्यातून आलेले पैसे स्वातीने तिच्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केल्याने दोघांत वाद झाले आणि स्वाती घर सोडून निघून गेली.स्वाती बेपत्ता झाल्याची तक्रार ओंकारने पोलिसात केली होती. नंतर ती तिच्या बहिणीकडे सापडली आणि अखेरीस ती पुन्हा माहेरी राहू लागली.
ओंकारने पुन्हा नांदण्यासाठी प्रयत्न केला असता, स्वातीच्या कुटुंबीयांनी नकार देऊन शिवीगाळ केली होती. त्यानंतर ओंकारला वेगवेगळ्या प्रसंगांत नाना काळे व इतरांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.दि. ८ जून २०२५ रोजी ओंकारने आत्महत्या केली. यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून ‘माझ्या मृत्यूला नाना काळे, स्वाती, तिचे आई-वडील व भाऊ जबाबदार असतील,’ असे नमूद केले होते.
ओंकारचा भाऊ विशाल हजारे याने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.या पार्श्वभूमीवर नाना काळे यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान ॲड. थोबडे यांनी युक्तिवादात सांगितले की, पोलीस तपासात अर्जदार आरोपी निर्दोष असून, ओंकारचा मृत्यू मानसिक तणाव आणि मद्यपानामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खटला गैरसमजुतीतून दाखल झाला असल्याचे पोलिसांनीच अहवालात स्पष्ट केल्याचे अधोरेखित करण्यात आले.या युक्तिवादावर न्यायालयाने कोणतीही अट न घालता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात अर्जदारांकडून ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. राम कदम यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. ए.व्ही. नरखेडकर यांनी काम पाहिले.