मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का; जिल्हा न्यायालयाचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाजूने
सोलापूर / प्रतिनिधी
मोहोळ नगरपरिषद व मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीतील नामनिर्देशनपत्र नामंजुरी प्रकरणातील दोन महत्त्वपूर्ण अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले असून, दोन्ही प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरवत उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा न्यायाधीश श्री. राजवैदय यांनी हा निर्णय दिला.

असे आहे मोहोळ प्रकरण :
अविनाश पांढरे यांचे अपील फेटाळलेमोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग ५ब मधून सर्वसाधारण गटातून लढणारे उमेदवार अविनाश तुकाराम पांढरे यांनी १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला होता.अर्ज छानणीवेळी शपथपत्रातील अनेक रकाने रिकामे असल्याचे व काही ठिकाणी ‘निरंक’ शब्द वापरल्याचे आढळले.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार शपथपत्र संपूर्ण व परिपूर्ण भरणे बंधनकारक असून, उमेदवाराला त्रुटी दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली होती. मात्र पांढरे यांनी सुधारित शपथपत्र दिले नसल्याने त्यांचे नामनिर्देशन १८ नोव्हेंबर रोजी नामंजूर करण्यात आले.या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी तीव्र हरकत नोंदवत युक्तिवाद केला. न्यायालयानेही हा युक्तिवाद मान्य करत पांढरे यांचे अपील फेटाळले. पांढरे यांच्या वतीने ॲड. एन. के. शिंदे यांनी काम पाहिले.
असे आहे मैंदर्गी प्रकरण :
परवीनबानो बांगी यांचेही अपील बादमैंदर्गी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग ६ (बीसीसी महिला) या आरक्षित जागेसाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या परवीनबानो म. मुजीब बांगी यांच्या नामनिर्देशनालाही छानणीदरम्यान हरकत घेण्यात आली.हरकतदार सौ. शमीमबानो महिबूब दफेदार यांनी दाखल केलेल्या निवेदनात, परवीनबानो यांच्या नामनिर्देशनातील नाव मतदारयादीतील नोंदीनुसार नसल्याचे स्पष्ट केले. त्रुटी दुरुस्तीसाठी संधी देऊनही उमेदवाराने सुधारित माहिती वेळेत सादर न केल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला.
या प्रकरणातही शासन पक्षाचे युक्तिवाद करताना जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी नियमांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने ते ग्राह्य धरत परवीनबानो बांगी यांचे अपील फेटाळले. त्यांच्या वतीने ॲड. निलेश ठोकडे उपस्थित होते.








