ग्रामविकास विभागाच्या ‘निर्मल वारी’ उपक्रमास वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, दि. 3 जुलै: आषाढी वारीतील संतांच्या १० मानाच्या पालख्या मार्गांवर ११ हजारांहून अधिक तात्पुरती शौचालयं उभारण्यात आली आहेत. ग्रामविकास विभागाच्या ‘निर्मल वारी’ उपक्रमामुळे वारकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

स्वच्छतेसाठी भक्कम नियोजन..
११,८८९ शौचालयांची उभारणी
पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विभाग
हात धुण्यासाठी साबण व पुरेशा पाण्याची व्यवस्था
रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था
३ किमी अंतरात सात ठिकाणी सुविधा केंद्र
शौचालयांसोबतच १,२५० पाण्याचे ड्रम, ५७ सक्शन मशीन, ५७ जेटिंग मशीन, १,५०० स्वच्छता स्वयंसेवक, २८३ शौचालय व्यवस्थापन कर्मचारी आणि १२३ अधिकारी/कर्मचारी वर्ग नेमण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रांशी समन्वय..
ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निवारा केंद्रे उभारली आहेत, त्या ठिकाणी शौचालय व स्नानगृहांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली येथे सीईओ जंगम व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
गतवर्षीच्या तुलनेत ४ पट वाढ..
या वर्षीच्या वारीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत चारपट शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिली.
नाशिक, पुणे, जळगाव येथून आलेल्या पालख्या समवेतही ही सुविधा देण्यात आली आहे.
‘निर्मल वारी’ उपक्रमामुळे वारीतील स्वच्छता, सुरक्षितता आणि सन्मान वाढला असून वारकरी समाधानी आहेत.
ग्रामविकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे या प्रयत्नांबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.