सोलापूर : सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दांडके, फरशी व पट्ट्याच्या सहाय्याने अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी आणि पिडीत महिला व अन्य चौघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह नऊ जणांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीसांनी यापूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपींचे व्हॉइस रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्हीमधील आवाजाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आले. याआधारे गोळा झालेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी प्रमोद गायकवाड यांनी कोल्हापूर येथून सोलापूर कारागृहात बदल करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. मात्र, न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी :
दि. १ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता, भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोलापूरच्या सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील काही युवक व महिला थांबले होते. यावेळी बुद्धविहाराजवळ आरोपी कुटुंबीयांसह उपस्थित होते. वाद निर्माण होऊन प्रमोद गायकवाड यांनी अदित्य दावणे यास पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिंकी शिवशरण व ऋतूज गायकवाड यांना देखील मारहाण करण्यात आली.
प्रमोद गायकवाड यांनी इतर आरोपींना “रॉड आणा, या लोकांना माज आलाय” असे सांगत आवाज दिला. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना जबर मारहाण केली. काही वेळाने, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वैभव उर्फ बंटी वाघे यास देखील मारहाण करण्यात आली.
तो दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना समरसेनजित उर्फ टिपू गायकवाड याने त्याला पाडले आणि फरशी उचलून डोक्यावर घातली. त्यानंतर प्रमोद गायकवाडसह सर्व आरोपींनी मिळून त्याला अमानुषपणे लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.
या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वैभव वाघे यास सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दि. ६ जानेवारी २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वैभवची आई आशा वाघे यांनी फिर्याद दिली होती.
या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. वैष्णवी न्हावकर व अँड. राहुल रुपनर, सरकार पक्षातर्फे अँड. दत्ता पवार, तर आरोपींच्या बाजूने अँड. शशी कुलकर्णी व अँड. प्रशांत नवगिरे हे विधिज्ञ काम पाहत आहेत.
सदर खटल्यातील पुढील सुनावणीला आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Adv Rahul Rupnar Santosh Nhavkar