सोलापूर, दि. १९ ऑगस्ट :
शेतकरी महादेव गजेंद्र सुर्वे (रा. आष्टी, ता. मोहोळ) यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल खटल्यात दोन सावकारांची निर्दोष मुक्तता झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा निकाल दिला.या प्रकरणात आरोपी म्हणून उमेश उत्तरेश्वर सुर्वे (४१) व शिवाजी नामदेव सुर्वे (३८, दोघे रा. बैरागवाडी, ता. माढा) यांच्यावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

प्रकरणाची पार्श्वभूमी
सन २०११ मध्ये महादेव सुर्वे यांनी मुलगा व मुलीच्या लग्नासाठी आरोपींकडून एकूण साडेचार लाख रुपये व्याजाने घेतले होते. पुढे २०१४ मध्ये त्यांनी एक एकर शेती विकून व्याजासहित सर्व पैसे परत केल्याचे समोर आले. मात्र घटनेच्या काही दिवस आधी आरोपींनी १८ लाख रुपयांची मागणी करून जमीन ताब्यात घेण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
९ मार्च २०२१ रोजी सततच्या दबावाला कंटाळून महादेव सुर्वे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चिठ्ठीही सापडली होती.त्यावरून महादेव यांचा मुलगा गणेश सुर्वे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
युक्तिवाद व निकाल..
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ऍड. मिलिंद थोबडे यांनी, मृत व्यक्तीच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन जमीन मिळवण्याच्या उद्देशाने हा खटला दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. सत्यवान सुर्वे (माढा), ऍड. सतीश शेटे यांनी काम पाहिले तर सरकारी बाजूने ऍड. ए. व्ही. नरखेडकर यांनी काम पाहिले.