MH 13 NEWS NETWORK
विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी सोलापूरचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संघटनात्मक अनुभव असलेले प्राचार्य श्री. गजानन धरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ प्रांतातील हस्तिनापूर येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मूळचे सोलापूरचे असलेले प्राचार्य गजानन धरणे हे विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून आजही ते अभाविपशी सक्रियपणे जोडलेले आहेत. सध्या ते सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या केंद्रीय बैठकीत अखिल भारतीय स्तरावरील इतरही नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद रामुका, सहमंत्री प्रा. अनंत पांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, सहमंत्री नितीन वाटकर, संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त प्रांत अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे यांचा थोडक्यात परिचय:
श्री. गजानन रेवणसिद्ध धरणे गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर येथे झाले असून कराड येथून त्यांनी यंत्र अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. यंत्र अभियांत्रिकी विभागात 40 वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा देत, गेल्या 16 वर्षांपासून ते श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य आहेत.
1980 पासून अभाविपमध्ये सक्रिय असलेल्या धरणे यांनी कराड शहर मंत्री, सातारा जिल्हा विस्तारक, जिल्हा प्रमुख तसेच 1992 ते 1994 दरम्यान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्र प्रदेश सहकार्यवाह, नंतर कार्यवाह म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सिनेट सदस्य, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य, हिंदू वीरशैव लिंगायत मंच सोलापूर जिल्हा संयोजक व पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक म्हणूनही ते कार्यरत आहेत.







