MH 13 NEWS NETWORK
गुणात्मक वाढीसाठी शैक्षणिक उपक्रम
सोलापूर – वालचंद शिक्षण समूहांतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी मार्गदर्शक विषयतज्ञ सचिन लांडगे, अनिलकुमार गावडे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ,पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, मराठी विभागप्रमुख मिलिंद खोबरे, व्याख्यानमाला समन्वयक विजयकुमार काळेगोरे, विकास शिळ्ळे यांची उपस्थिती होती.
यावेळी दहावी विद्यार्थ्यांना सचिन लांडगे व अनिलकुमार गावडे यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. यामध्ये मराठी विषयाची कृतीपत्रिका कशी सोडवावी? आकर्षक मांडणी, वेळेचे नियोजन याविषयी विस्तृत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी पाठ्यपुस्तकेच विद्यार्थ्यांना अधिक उंचीचे यश गाठण्यास मदत करतात म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचण्यास प्राधान्य द्यावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजन दहावीच्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा चव्हाण हिने केले तर अक्षरा पाटील हिने आभार मानले.