MH 13 News Network
दुहेरी जलवाहिनीचे काम एका महिन्यात पूर्ण होणार महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांचे प्रतिपादन
शहराची गरज ओळखूनच केला शहर विकास आराखडा !महापालिकेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
सोलापूर : सव्वा दोन वर्षाच्या आयुक्त पदाच्या कार्य काळामध्ये सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असलेले पण दुर्लक्षित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावले. उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम एका महिन्यात पूर्ण होणार आहे. सोलापूर शहराची गरज ओळखूनच शहर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले पुढे म्हणाल्या, सव्वा दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला. अनेक प्रश्न प्रलंबित होते. जे प्रश्न सर्व शहराचे आहेत मात्र ते दुर्लक्षित आहे असे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले. यामध्ये भरती नियमावली, बिंदू नामावली, 302 पदांची भरती प्रक्रिया, पदोन्नती यासह विविध प्रशासकीय कामे प्राधान्याने पूर्ण केली.
विशेष म्हणजे विविध टप्प्यांवर रखडलेली उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावला आहे याचे समाधान आहे. 110 किलोमीटरची असलेली ही जलवाहिनी सर्व अधिकाऱ्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन अनेक अडथळे येऊनही हे काम मार्गी लागले आहे. सद्यस्थितीत 105 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मागील वर्षी उजनी वजा पातळीमध्ये होती. यामुळे या एका सीझनमध्ये जॅकवेलचे काम पूर्ण केले, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी केले. महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, एजाजहुसेन मुजावर, भगवान परळीकर , राकेश कदम, शिवाजी सुरवसे, युसुफ शेख आदींसह पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
200 कोटी रुपयांचे दायित्व दिले सोलापूर महापालिकेने विविध प्रकारचे देणे द्यायचे होते. यामध्ये स्मार्ट सिटीचा हिस्सा, कर्ज परतफेड आदी पैशांसह एकूण 200 कोटी रुपयांचे दायित्व आतापर्यंत दिले आहे.
सर्व सोयी सुविधा देत असताना हे काम करण्यात आले असल्याचेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.विकास आराखड्यात काय लिहिले ते बघावे सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करत असताना सोलापूर शहराची गरज ओळखून तो करण्यात आला आहे. प्रारूप आराखडा काय आहे ? हे पाहून हरकत घ्यावी. शहरात जिथे आवश्यक आहे. तिथेच आरक्षण टाकावे लागले आहे. स्टेडियमची जागा कमी केली नाही, त्यासाठी जितकी गरज होती तेवढीच जागा ठेवण्यात आली आहे.
तटस्थपणे हा आराखडा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आराखड्यात काय लिहिले आहे हे आधी बघावे. त्यांच्या हरकती व सूचनांवर सुनावणी होईल, असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी यावेळी स्पष्ट केले.
कायम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न शहर हे हृदय असते. रोजच्या सोयी सुविधा चालू ठेवून सर्व प्रकल्प पूर्ण करावे लागते. त्याप्रमाणे हे प्रकल्प मार्गी लावले आहेत. अनेक कामे पूर्ण केली. पायाभूत सुविधा व्यवस्था चांगली केली. कायम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही यावेळी महापालिका आयुक्त तेली – उगले यांनी सांगितले.