सातारा / प्रतिनिधी
सज्जनगडावर राज्यातून आणि परराज्यातून हजारो समर्थ सेवक दर्शनासाठी तसेच रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यंदाच्या वर्षी श्री रामदास स्वामी संस्थानाच्या वतीने आयोजित केलेल्या बालदासांच्या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून मंगळवारपासून कीर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानाच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री रामदास स्वामी संस्थानाच्या वतीने समर्थ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार, समर्थाच्या विचारांच्या प्रसाराचे, संस्काराचे कार्य अखंडपणे केले जाते. यंदा सज्जनगडावर कीर्तनासह दासबोध शिबिरही आयोजित केले असून, नुकत्याच संपलेल्या बाल संस्कार शिबिरात राज्याच्या विविध भागांतील दीडशेहून अधिक मुले-मुली सहभागी झाली होती.
श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने सज्जनगडावर वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. नवीन पिढी सुधारावी, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी दर वर्षी सज्जनगडावर बालसंस्कार शिबिर आयोजिले जाते.
असा असतो शिबिराचा दिनक्रम..
बालमनावर उत्तम संस्कार होण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये पहाटेपासूनच दिनक्रम सुरू होतो. सूर्यनमस्कार, योगा, विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजिली होती. रोज सकाळी सूर्यनमस्कारापासून रात्री संगीत कला, गुणदर्शन इत्यादी कार्यक्रम दिवसभरात मुलांकडून करून घेतले जात होते. शिबिराचा समारोप नुकताच झाला असून या कार्यक्रमाला संस्थांचे अध्यक्ष भूषण स्वामी व विश्वस्त बाळासाहेब स्वामी उपस्थित होते. शिबिर प्रमुख संगीता कुलकर्णी यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
दासबोध अभ्यास वर्ग..
समर्थांच्या विचाराचा आणि वाङ्मयाचा प्रसार व्हावा, तसेच दासबोध या मुख्य ग्रंथाबाबत अभ्यासकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी संस्थानच्या वतीने दर वर्षी दासबोध अभ्यास वर्ग आयोजित केला जातो. पुण्यामंबईसह विविध राज्यांतील अभ्यासक या शिबिरात सहभागी होतात. यंदा १४० अभ्यासक मंडळींनी सहभाग नोंदवला होता.
कीर्तन शिबिराचे आयोजन..
कीर्तन परंपरा सुरू राहावी, नवीन पिढी त्यामध्ये यावी, यासाठी संस्थानच्या वतीने कीर्तन शिबिरही आयोजित केले जाते. शिबिरात नामवंत कीर्तनकार मार्गदर्शन करतात. या वर्षी १४ ते २० मे या कालावधीत हे कीर्तन शिबिर होणार आहे. सहा दिवसांच्या या शिबिरात रामदासी कीर्तनाचे प्रशिक्षण दिले जाते. या वर्षी समर्थ भक्त वासुदेव बुवा बुरसे हे अभ्यासकांनी कीर्तनाचे धडे देणार आहेत.