सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर, दि. ०३ जुलै :ओंकार महादेव हजारे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे (रा. सोलापूर) यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मनोज शर्मा यांनी २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर व तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला.

प्रकरणाची पार्श्वभूमी :
मयत ओंकार हजारे याचे स्वाती नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, स्वातीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता.
त्यामुळे दोघे पुण्यात वास्तव्यास होते.ओंकार हा कार भाड्याने चालवत होता आणि कमाईचे पैसे स्वाती हिने बहिणीच्या खात्यावर जमा करत असल्याने त्यांच्या नात्यात वाद निर्माण झाला. त्यातूनच स्वाती घर सोडून गेली आणि नंतर ती तिच्या माहेरी परत आली.
स्वातीला परत घेण्यासाठी ओंकार तिच्या घरी गेला असता, तिच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत नकार दिला. यामुळे ओंकार मानसिक तणावात गेला.
एका प्रसंगी त्याने विषही प्राशन केले होते.
दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नाना काळे व मंगेश पवार यांनी ओंकारची दुचाकी काढून घेतली होती. दरम्यान, स्वातीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर नाना काळे व त्यांच्या साथीदारांनी ओंकारवर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यांच्या टोळीतील २०-२५ युवकांनी ओंकारला घराजवळ येऊन तसेच फोनवरूनही धमकावले, असे फिर्यादीत नमूद आहे.
मे २०२५ मध्ये ओंकारने आपल्या मोबाईल स्टेटसवर “माझा घातपात झाल्यास नाना काळे, स्वाती आणि तिचे आई-वडील जबाबदार असतील” असा मजकूर टाकला होता.दि. ८ जून २०२५ रोजी मेव्हण्याच्या लग्नाला गेलेल्या ओंकारला सासरच्या मंडळींनी अपमानित करत कार्यक्रमातून हाकलून दिले. त्या रात्रीच ओंकारने आत्महत्या केली.
या प्रकरणी ओंकारचा भाऊ विशाल हजारे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नाना काळे यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.यावेळी ॲड. थोबडे यांनी “सदर गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या व्याख्येत बसत नाही” असा युक्तिवाद न्यायालयात मांडला.
न्यायालयाने तो ग्राह्य धरत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.या खटल्यात आरोपीकडून ॲड. मिलिंद थोबडे आणि ॲड. राम कदम यांनी काम पाहिले.








