MH13NEWS Network
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक संनियंत्रण कक्ष व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचेही भूमिपूजन
पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक संनियंत्रण कक्षाचे आणि ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजनही यावेळी संपन्न झाले.

शहर पोलीस ठाण्याच्या मागे नव्याने उभारण्यात आलेल्या या एकात्मिक संनियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे अहोरात्र नजर ठेवली जात आहे. या कक्षाद्वारे मिळालेल्या चित्रीकरणावरून आतापर्यंत सुमारे १४ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

‘हरित वारी’ या उपक्रमांतर्गत सोलापूर ग्रामीण हद्दीत दीड लाखांहून अधिक वृक्ष लागवड केली जाणार आहे. प्रत्येक झाडाला क्यूआर कोड असणार असून, झाडाची जात, लोकेशन आणि सद्यस्थितीची माहिती ॲपमधून पाहता येणार आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे संपूर्ण मोहिम पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

या वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीला भाविकांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कार, सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने आणि देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक जनप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Devendra Fadnavis CMOMaharashtra Jaykumar Gore Kothe Devendra Rajesh Devendra Rajesh Kothe Sachin Kalyanshetti Gopichand Padalkar – गोपीचंद पडळकर Ranjitsinh Mohite Patil