MH 13News Network
शेतकऱ्यांना पीक विमा, अवकाळीचे थकीत अनुदान वेळेत द्या; माजी आमदार दिलीप माने यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर – दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाकडून मिळणारा निधी,ई-पीक नोंदी न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा अद्याप प्राप्त झाला नाही. या संदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.
या प्रसंगी माने यांच्यासह गंगाधर बिराजदार ,आप्पासाहेब बिराजदार-पाटील,विकास पाटील,निशांत लाडे,कल्याणी शिरगोंडे,पिरसाब हवालदार,रावसाहेब आळगी,महादेव बोरगी,इरेशा कोळी,नितिन देशपांडे,संजय जाधव, विकास बिराजदार,श्रीकांत बंडगर, माळप्पा बंडगर,सचीन ढेपे,ज्ञानोबा साखरे,दयानंद स्वामी आदि शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप माने यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्पशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्रातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. मात्र यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे 54715 शेतकयांची खरीप हंगाम 2023-24 मध्ये पीक विमा अर्ज भरला होता. त्यापैकी केवळ 917 शेतकयांना पिक विमा प्राप्त झाला आहे. तर इतर 80 टक्के शेतकरी अद्याप पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
तसचे 2023 मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करुन त्याचे वितरण सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही या दोन्ही तालुक्यातील सुमारे 20 टक्के शेतकऱ्यांना आधार प्रामाणीकरण होऊन तसेच व्हि.के. नं. (Vk no.) प्राप्त झालेला असतानाही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच सुमारे 10 टक्के शेतकयांचे आधार प्रमाणिकरण व व्हि.के. नं. (Vk no.) येणे प्रक्रिया झाली नसल्याने काही शेतकऱ्यांना पैसेच मिळणार नाहीत. त्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी माने यांनी यावेळी केली.
याशिवाय माने यांच्या शिष्टमंडळाने ई पीक नोंद न झाल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची मागणी केली आहे. यामध्ये 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या नुकसानी पोटी शासनाने प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतला होता. मात्र जय्क शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरीता पात्र ठरले. मात्र, ज्या शेतकऱ्यांची ई-पीकांची नोंद झाली नाही, अशा शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याच्या गोष्टीकडे माने यांनी लक्ष वेधले आहे.
माने यांनी केले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे कौतुक
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक भूमिका घेत सोमवारी पीक विमा आणि थकीत अनुदान देण्यासंदर्भात तातडीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यातील तज्ञ शेतकऱ्यांनाही बैठकीची उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आमदार माने यांनी त्यांचे कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया माने यांनी यावेळी दिली.