.
सोलापूर विकासाला गती.! दोन उड्डाणपुलांसाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
सोलापूर :सोलापूर महानगरपालिका सभागृहात आज मित्रा (Maharashtra Institution for Transformation) या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार श्री. प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून जिल्हा परिषद,नगरपालिका आणि त्यानंतर महानगरपालिका अशा क्रमाने निवडणुका होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे भिजत असलेले घोंगडे वाळण्यासाठी प्रयत्न जोमाचे सुरू झाले आहेत. इलेक्शन जवळ आलंय अशी प्रतिक्रिया इंद्रभवनच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

या दोन प्रस्तावित उड्डाणपूलांचा विषय..
या बैठकीत “जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल” आणि “जुना बोरामणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल” या दोन प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी बाधित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) श्री. हसन गौहर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, एमआयडीसी अक्कलकोट रोडचे अध्यक्ष तिलकचंद शहा, एमआयडीसी अधिकारी एस. टी. राठोड तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उड्डाणपुलांच्या मार्गात येणाऱ्या आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या शासकीय विभागांच्या मालकीच्या जागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या विभागांचे अधिकारी उपस्थित..
या विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा दूध संघ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, महावितरण, पोस्ट ऑफिस, मध्य रेल्वे विभाग, बीएसएनएल टेलिकॉम सर्व्हिसेस, पोलीस आयुक्त (शहर) कार्यालय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय, डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज आदी विभागांचा समावेश आहे.
बैठकीदरम्यान श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व संबंधित विभागांना बाधित होणाऱ्या जागांचा त्वरित तपशील, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तसेच संबंधित प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
यामुळे उड्डाणपुलांच्या कामाला वेग मिळून प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेत विलंब होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन संदर्भातही महत्त्वाची चर्चा झाली. पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि उड्डाणपुलांच्या बांधकामासोबत समन्वय राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.
तसेच देगाव येथील एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) संदर्भात एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. या बैठकीत शहरातील सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर यासंबंधीच्या पुढील कार्यवाहीचा आराखडा निश्चित करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून प्रकल्पाची अंमलबजावणी गतीमान करण्याचे आवाहन केले.उड्डाणपुलांच्या कामामुळे सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न..!

“जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल” आणि “जुना बोरामणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल” हे सोलापूर शहरवासीयांसाठी केवळ स्वप्न बनते का? अशी चर्चा सोशल मीडियावर नेहमी रंगलेली असते.
शहरातील या दोन उड्डाणपलासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यापासून स्थानिक आमदार, नेते, पालकमंत्री, आयुक्त, आणि केवळ एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील अशा संघटना उड्डाणपूलाविषयी, भूसंपादन, निधी याबाबत बोलताना दिसतात. परंतु अद्यापही उड्डाणपूल प्रत्यक्षात उतरलेला नसल्याची खंत सोलापूरकर व्यक्त करताना दिसतात.
आज महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर उड्डाणपुलाची आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि आयुक्त यासाठी संवेदनशील पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे.
या दोन्ही उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या 49 जागांचा अडथळा आहे. त्या जागा अद्यापही शासनाने ताब्यात घेतलेल्या नाहीत. खाजगी व्यक्ती जागा देण्यासाठी तयार आहेत परंतु बोरामणी विमानतळासारखी आमची अवस्था होऊ नये. भूसंपादन करताना निधी कितपत मिळेल, तसेच काम वेळेत पूर्ण झाले नाही तर उड्डाणपूल ही नाही आणि निधी ही पुरेसा नाही अशी सोलापूरकरांची अवस्था होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पूर्तता करावी. अशी प्रतिक्रिया सोलापुरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते केतनशहा यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
Solapur Municipal Corporation, SolapurCMOMaharashtra
#सोलापूरडेव्हलोपमेंट
#UrbanInfrastructure#FlyoverProject#PravinsinghParadeshi#SolapurMunicipalCorporation#SmartCitySolapur#PublicInfrastructure#MitraMaharashtra#TransformingSolapur#SolapurNews#DevelopmentMeeting#UrbanPlanning#MaharashtraTransformation









