MH 13 News Network
अखेर आ. सोपल यांची मातोश्रीवर भेट, चर्चेला पूर्णविराम, उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन
बार्शी : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना युबीटी पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक झाली. मात्र, बार्शीचे आमदार दिलीप सोपल या बैठकीला उपस्थित नव्हते. शिवाय विजयानंतर ते पक्षप्रमुखांच्या भेटीला न गेल्याची चर्चाही मतदारसंघात होती, अखेर विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आ. दिलीप सोपल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात सर्वच आमदारांचा शपथविधी आणि गाठीभेटी झाल्या. त्यामध्ये, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचाही शपथविधी झाला.
ते 7 व्यांदा विधानसभा सभागृहात जात असल्याने पूर्वीच्या अनेक नेत्यांच्या ओळखी आणि जवळीकही त्यांची दोन दिवसांत फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांना जादू की झप्पी देणारे सोपल अद्याप उद्धव ठाकरेंना भेटले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिलीप सोपल यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीत निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी, शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. त्यामुळे, विजयानंतर 15 दिवसांनी सोपल हे उद्धव ठाकरेंना भेटल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.