MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव (ता. अक्कलकोट) हे गाव धार्मिक आणि ग्रामीण परंपरेचा अनोखा संगम असलेले गाव म्हणून पुढे येत आहे. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या पर्यटन विकास उपक्रमात गौडगावचा समावेश “धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे गाव” म्हणून करण्यात आला आहे.
गौडगाव हे जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरासाठी राज्यभर प्रसिद्ध असून, समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. उपलब्ध झालेल्या माहिती नुसार चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, रामनवमी तसेच श्रावण अमावास्येला महाराष्ट्रातूनच नाही तर तेलंगना आणि कर्नाटक या राज्यातून देखील येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याचबरोबर ग्रामदैवत महालक्ष्मी (सीमा लक्ष्मी) देवीची तीन वर्षांतून एकदा होणारी यात्रा ही गावाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते.
धार्मिक आणि आध्यात्मिक ओळखीसोबतच गौडगावची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. लिंबू बागायत शेती, ज्वारी-बाजरी उत्पादन, दुग्ध व्यवसाय, पारंपरिक शेती पद्धती आणि ग्रामीण खाद्यसंस्कृती हे गावाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. या सर्व घटकांच्या आधारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न उपलब्ध करून देणे आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा पर्यटन विकासामागील मुख्य उद्देश आहे.
पर्यटन विकास उपक्रमामुळे आगामी काळात पर्यटकांसाठी धार्मिक दर्शन, अशोक वाटिका, शिवारफेरी, ग्रामीण खाद्य अनुभव, स्थानिक उत्पादनांची खरेदी, माहिती दालन तसेच लोककला व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे गौडगाव हे सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श धार्मिक व ग्रामीण पर्यटन गाव (Model Tourism Village) म्हणून विकसित होईल, असा विश्वास प्रशासनाने व गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.








