नगर परिषदेतील कर्मचाऱ्यास मारहाणप्रकरणी माजी नगरसेवकाची निर्दोष मुक्तता
सोलापूर | अक्कलकोट
अक्कलकोट नगर परिषदेतील स्वच्छ भारत अभियानाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी नगरसेवक उत्तम शेकाप्पा गायकवाड (रा. भीमनगर, अक्कलकोट) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
ही घटना 19 डिसेंबर 2015 रोजीची आहे. तत्कालीन संगणक अभियंता भालचंद्र सदानंद उंबरजे यांना मुख्याधिकारी यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आलेल्या अर्जांची स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

यानुसार उंबरजे कर्मचारी विठ्ठल तेली आणि सुधाकर माळवदकर यांच्यासह भीमनगर परिसरात तपासणीस गेले असता, आरोपी उत्तम गायकवाड यांनी त्यांना “काम व्यवस्थित करत नाही” असे म्हणत शिवीगाळ, कॉलर पकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास तत्कालीन पोलीस हवालदार रामू पवार यांनी केला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल झाले.सरकार पक्षातर्फे 4 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
तर बचाव पक्षातर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी साक्षीदारांचे विधान विसंगत असल्याचे, घटनेचा स्वतंत्र साक्षीदार नसल्याचे आणि फिर्याद देण्यात झालेल्या विलंबाचे समाधानकारक कारण नसल्याचे मुद्दे मांडले.हे मुद्दे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जे. कटारिया यांनी माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे व अॅड. राजकुमार मात्रे, तर सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.









