मुंबई : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. या कार्यक्रमास आमदार श्रीमती यामिनी जाधव, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव हे उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, या अनुषंगाने राज्यामधील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.
या आचार्य चाणक्य कौशल्य विकास १००० केंद्रांचा उद्घाटन समारंभ २० सप्टेंबर, २०२४ रोजी दु.१२.३० वा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न झाला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयतर्गत १२ महाविद्यालये या कार्यक्रमात सहभागी झाले.
यावेळी श्रीमती यामिनी जाधव यांनी तरूणांनी त्यांच्यामधील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे रोजगार,स्वयंरोजगार प्राप्त करावा असे आवाहन केले. तसेच श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण १२ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहरचे सहायक आयुक्त संदिप गायकवाड, बुरहानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल कादीर भाईसाहेब तमीम, डॉ.हुजेफा हुसैन,बुरहानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. हुजफा भगत ,मुरतुझा मंदसौरवाला उपस्थित होते.