MH13NEWS Network
श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या १६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर, कामगारांना १५ दिवसांचा बोनस देणार..
कारखाना साईट / दि. २८ ऑक्टोबर
श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या १६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ परमपूज्य स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज (चिंचगाव टेकडी) यांच्या शुभहस्ते, तसेच आमदार व संस्थापक चेअरमन ॲड. धनाजीराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हाईस चेअरमन सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

कार्यक्रमात श्री सत्यनारायण व काटा पूजन संचालक मधुकर चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. जयश्रीताई यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमादरम्यान श्रीसंत कुर्मदास महाराज, स्व. गणपतराव साठे आणि लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमांनाही अभिवादन करण्यात आले.
अडचणींवर मात करत कारखान्याची प्रगती..

प्रास्ताविकात संचालक दादासाहेब साठे यांनी सांगितले की, “कारखाना अडचणींवर मात करत शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. चालू हंगामात ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी मशिनरी आणि वाहतूक यंत्रणा सज्ज आहे.”
पुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या ऊसाला गाळपात प्राधान्य दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला ऊस कारखान्यास द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उत्पादनवाढ व नवीन प्रकल्प स्व. विलासराव देशमुख ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान राबविण्यात येत असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.तसेच, भविष्यात १४ मेगावॅट सहवीज निर्मिती व प्रतिदिन ५ मेट्रिक टन सीबीजी प्रकल्प उभारणीचे नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांना ऊसदर, कामगारांना बोनसचालू हंगामात शेतकऱ्यांना परिसरातील इतर कारखान्यांप्रमाणे ऊसदर देण्यात येणार असून, कामगारांना प्रोत्साहन म्हणून १५ दिवसांच्या पगाराएवढा बोनस देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय जाहीर करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती..
कार्यक्रमास आमदार धनाजीराव साठे, सुधीर पाटील, बी.डी. पाटील, भालचंद्र पाटील, हरिदास खताळ, दादासाहेब साठे, राहुल पाटील, मधुकर चव्हाण, नारायण गायकवाड, शालिनी कदम, संध्याराणी खरात, नगराध्यक्षा मीनल साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, तसेच विविध समाजसेवक, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. समाधान लटके यांनी केले.








