मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाखांहून अधिक वारकरींना विश्रांती!
ग्रामविकास विभागाच्या उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद
सोलापूर, दि. 3 जुलै:
आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे उभारण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रा’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ५५ जर्मन हॅंगर निवारा मंडपांत सुमारे ७ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी विश्रांती घेतली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या केंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी प्रत्येक सोयी-सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला आहे.

जगाच्या पाठीवर जर्मन हॅंगर मंडपात विश्रांतीचा अनुभव
पारंपरिकपणे रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली निवारा घेणाऱ्या वारकऱ्यांना यंदा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षां’मुळे सुरक्षित आणि आरामदायी आश्रय मिळाला आहे.
धर्मपुरी कारूडे ते वाखरी मार्गावर १ लाख चौरस फुटांमध्ये ५५ जर्मन हॅंगर मंडप आणि ११ जलरोधक मंडप उभारण्यात आले आहेत.
मंडपांमध्ये हिरव्या मॅटचे भूतल, हिरकणी कक्ष, वैद्यकीय कक्ष, स्वच्छतागृहे, स्नानगृह, फुट मसाजरसह चरण सेवा, महिलांसाठी स्वतंत्र विभाग अशा विविध सुविधा आहेत.

सुविधांचा मेळा – मोबाइल चार्जिंग ते थेट दर्शन..
मोबाईल चार्जिंगसाठी २०० पॉइंट्स
एलईडी स्क्रीनवर भक्तिगीते, स्वच्छता संदेश व सुविधा माहिती
थेट श्री विठ्ठल दर्शनाची ऑनलाईन लिंक
या केंद्रात एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने वारकरी सुखावले आहेत.
महिलांचे प्रमाणही यामुळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पाहणी दौरे आणि उच्चस्तरीय निरीक्षण…

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे पाहणी केली. तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील सुविधा केंद्रांची पाहणी केली.
या उपक्रमामुळे यंदाची वारी अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि आधुनिक झाली आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्ष’ वारकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत.