MH 13News Network
शिक्षणाबरोबर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा : मनीषा आव्हाळे
श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठान तर्फे माध्यमातील महिलांचा सन्मान
सोलापूर : गृहिणी अथवा आई असो ते आयएएस अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो. संघर्ष हा संघर्ष असतो. सध्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी येथे केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्या शोभा बोल्ली, श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ऍड. संदिप संगा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सीईओ मनीषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या योगदानामुळेच सर्व क्षेत्रात महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो. तो साजरा झाला पाहिजे. जावे ज्यांच्या वंशा तेव्हा वेदना कळतात. माझं दुःख, माझा संघर्ष एकटीचा नाही, तो सर्वांचा असतो. ग्रामीण असो अथवा शहरी आता संधीची उपलब्धता समान आहे परंतु सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. तो ढळू न देता वाटचाल करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सुद्धा महिलांनी आता कमी पडता कामा नये. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विविध माध्यमांद्वारे केले जाते. त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे मोठे समाधान आहे.
शोभा बोल्ली म्हणाल्या, महिलांनी चूल आणि मुल सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेले आहेत. महिलांचे कर्तुत्व आता चौफेर आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे. महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीनिवास संगा यांनी कुटुंबात मुलांवर संस्कार घडविण्यात वडिलांपेक्षा आईचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी श्रुती कुलकर्णी व अपर्णा गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
केले. यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.