MH 13 NEWS NETWORK
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; शिक्षक मतदारसंघासाठी १२ मेपर्यंत नावनोंदणी करता येणार
धुळे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार, १० जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले की, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना बुधवार, १५ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक बुधवार, २२ मे, २०२४ राहील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, २४मे, २०२४ रोजी होईल. सोमवार, २७ मे, २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. सोमवार, १० जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल, तर १३ जून, २०२४ रोजी मतमोजणी होईल. मंगळवार, १८ जून, २०२४ रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी नावनोंदणी केलेले शिक्षक मतदार मतदान करण्यास पात्र राहतील.
या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यात ८ हजार १३१ शिक्षक मतदार आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्धी झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस अगोदर पर्यंत म्हणजेच १२ मे, २०२४ पर्यंत करता येईल. तरी शिक्षकांनी शेवटच्या दिवसांपर्यंत मतदार नोंदणीसाठी वाट न बघता तात्काळ मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही श्री. गोयल यांनी केले आहे.
मतदार यादीनिहाय भागाचे नाव व एकूण मतदार संख्या (कंसात मतदार संख्या) – साक्री- पुरुष ७१७ स्त्री १५१, पिंपळनेर पुरुष ५६४, स्त्री १३२, दोंडाईचा पुरुष ३८३, स्त्री १५९, शिंदखेडा पुरुष ५०७ स्त्री १०६, शिरपूर पुरुष १४१७, स्त्री ४९५, धुळे ग्रामीण पुरुष १३४१, स्त्री २६९, धुळे शहर पुरुष १२७३, स्त्री ६१७असे एकूण ८ हजार १३१ मतदार आहेत. तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले.
मतदार नोंदणीसाठी सूचना
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर, २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी सुधारीत अर्ज क्रमांक १९ भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जात नाही.