पॉवर शो | रेड कार्पेटवर इच्छुकांची एन्ट्री, ढोली-ताशांच्या तालावर राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा उमेदवारी अर्ज..
विशेष प्रतिनिधी /सोलापूर
महापालिका निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारण तापायला सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वागतासाठी थेट “हटके स्ट्रॅटेजी” मैदानात उतरवली आहे. रेड कार्पेट, ढोली-ताशांचा गजर आणि उत्साही कार्यकर्त्यांची गर्दी या सगळ्यामुळे राष्ट्रवादीचे स्वागत शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात येताच राजकीय संदेशही इच्छुक उमेदवारापर्यंत पोहोचण्यामध्ये शहर जिल्हा कमिटीचा उद्देश स्पष्ट झालाय.पक्ष इच्छुकांना केवळ अर्जदार नव्हे, तर भावी नगरसेवक म्हणून पाहत आहे. ढोली-ताशांच्या गजरात झालेल्या या स्वागतामुळे राष्ट्रवादीत नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. प्रत्येक जाती-धर्माला समान न्याय देण्याची आमची भूमिका आहे. आज अर्ज भरण्यासाठी येणारे इच्छुक हे आमच्यासाठी नगरसेवकच आहेत, म्हणूनच त्यांचे स्वागतही तसंच आनंदात आणि दिमाखात होणे गरजेचे आहे ” असे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
साधा इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम न ठेवता राष्ट्रवादीने पॉवर, प्लॅनिंग आणि पॉलिटिकल सिग्नल तीनही एकाच वेळी दिले आहेत. इथे केवळ स्वागत नव्हे, तर ‘आम्ही निवडणुकीसाठी रेडी आहोत’ असा थेट संदेश शहरभर पोहोचल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी नेते, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अब की बार 75 पारचा दिलेला नारा स्वबळावर असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याची चर्चा पक्षात रंगली आहे.Ajit Pawar Santosh Pawar – संतोष पवार Anna bansode – अण्णा बनसोडे








