MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पुन्हा सकल मराठा समाज एकत्रित येत असून आज सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये मराठा समाजाच्या मतांचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढवण्यामध्ये जरांगे पाटलांचे आंदोलन हे संपूर्णतः यशस्वी ठरले आहे. सगेसोयरे आरक्षण अध्यादेश काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी पुन्हा लावून धरली आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसापासून अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. काल रात्री त्याची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये सोलापूर जिल्हा हा आरक्षण आंदोलनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक मोहोळ येथील ममता थिएटर येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.