सोलापूर /प्रतिनिधी
लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान, सोलापूर तर्फे आमदार श्री. विजयकुमार (मालक) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आशा स्वयंसेविकांना एप्रोन (Apron) वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचा ध्यास आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.

दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी नवी पेठ येथील आमदार देशमुख यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या 601 आशा स्वयंसेविका यांना दिवाळी भेट म्हणून हे एप्रॉन देण्यात आले. जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या निःस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा देण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब मोरे व कार्याध्यक्ष श्री. प्रमोद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नरेंद्र काळे, संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी, शिवानंद पाटील, दिनेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय टोंपे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांना दूध वाटपाने करण्यात आला.

समाजसेवेच्या भावनेचा गोडवा वाढवत आमदार देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.









