MH13NEWS Network
दोन महिन्यांपासून त्रुटी दुरुस्तीसाठी पोर्टलवर सुविधा नाही; अर्जदारांची गैरसोय
सोलापूर, दि. २९ जुलै (प्रतिनिधी):पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अर्जात झालेल्या त्रुटींमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शेकडो शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अर्ज नाकारण्यात आल्यावर पुन्हा अर्ज करण्याची अथवा त्रुटी दुरुस्त करण्याची कोणतीही सुविधा शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
पंतप्रधान किसान सन्माननिधी हा लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे सद्यस्थितीत लाभ मिळत नाही. लवकरात लवकर या त्रुटी दुरुस्त करून योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

📌 अर्ज करताच त्रुटी दाखवून नकार:
सदर योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० चा लाभ मिळतो. मात्र, अर्ज करताना केवळ सातबारा उतारा जोडण्याची व्यवस्था असताना आता शासनाने आठ अ उतारा, सहा ड फेरफार, व संमती पत्रे अनिवार्य केल्यामुळे अनेक अर्ज अपूर्ण समजून नाकारले गेले आहेत.

अर्ज नाकारले गेले तरी पुन्हा भरता येत नाहीत, आणि ना त्यासाठी स्वतंत्र त्रुटी दुरुस्तीचा टॅब उपलब्ध आहे. परिणामी, ऑनलाईन सेवा केंद्रे आणि तहसील कार्यालयांचे फेरे मारूनही शेतकऱ्यांची अडचण सुटलेली नाही.
👥 वारसांना विशेष फटका:
मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी वारस नोंद करून अर्ज सादर केले, मात्र सामायिक सातबाऱ्यावर संमतीपत्राचा अभाव दाखवून अर्ज नाकारले गेले. शासनाने नव्या अटी जाहीर केल्यानंतर त्या पोर्टलवर स्पष्ट न करता अर्जदारांना फटका बसतोय, अशी तक्रार अर्जदारांकडून येते.
🔁 पोर्टलवरील व्यवस्था अस्तित्वातच नाही:
नकारलेले अर्ज पुन्हा सबमिट करता येत नसल्याने शेतकऱ्यांना थेट हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
शेतकऱ्यांनी यासंदर्भात शासन दरबारी त्वरित “त्रुटी दुरुस्ती” टॅब उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
📣 पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया:▫️ पोर्टलवरील त्रुटी लवकरच दूर करू – पालकमंत्री गोरे“

किसान सन्मान योजनेतील त्रुटी दुरुस्तीबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित मार्ग काढण्यात येईल.”जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर—
#PMKisanYojana #FarmersIssue #SolapurNews #JaykumarGore #PMKisanPortalError