mh 13 news network
अक्कलकोट | प्रतिनिधी :
अक्कलकोट शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय स्नेहा श्रीकांत बनसोडे हिची तिच्या प्रियकराने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना रविवार, ४ जानेवारी रोजी दुपारी सुमारास लोखंडे मंगल कार्यालयाजवळील कोळी यांच्या बंगल्यातील लॉजमध्ये घडली.
आरोपी आदित्य रमेश चव्हाण (वय २४, रा. नागूर तांडा, ता. अक्कलकोट) याने स्नेहाची हत्या केल्यानंतर स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी असून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत तरुणी : स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २२ वर्षे)
रा. रामवाडी, सोलापूर सध्या शिक्षणासाठी मैंदर्गी येथे वास्तव्यास
या प्रकरणी स्नेहाची आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे (वय ४०) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. आरोपीवर खूनाचा गुन्हा (कलम ३०२ सह इतर कलमे) दाखल करण्यात आला असून गुन्हा क्र. ५/२०२६ (भाग ५) अशी नोंद आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्राथमिक तपासात हे प्रेमसंबंधातून उद्भवलेले प्रकरण असल्याचे समोर आले आहे. आरोपी आणि स्नेहा दोघेही लॉजमध्ये थांबले असताना वाद होऊन आरोपीने ब्लेडने गळ्यावर वार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भिताडे व पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स व इतर पुरावे तपासले जात आहेत.
या घटनेमुळे अक्कलकोट परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे








