सोलापूर : गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक सदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरटयानं रविवार दि ३१ मार्च रोजी मालकाच्या सांगण्यावरून डायव्हरने चोरून नेला होता.गुन्हे शाखा पोलिसांनी दोन दिवसातच सी सी टीव्ही च्या आधारे तपास करीत चोरट्यासह वाळूचा टेम्पो पकडला आहे.याप्रकरणी सचिन दयानंद शिंदे (वय २८. रा. टाकळी दक्षिण सोलापूर ) यास अटक केली आहे.
सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकातील पोलिस अंमलदारानी चोरी झालेल्या परिसरातील सी सी टीव्ही कॅमेराची पडताळणी करून व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेला एमएच १२ आर ८६७६ क्रमांकाचा टेंपो वाळूसह आरोपी सचिन शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन दयानंद शिंदे यांनी वाळू माफिया अनिल व्हनमाने (रा. समशापूर, नंदुर ता. दक्षिण सोलापूर ) याच्या सांगण्यावरून रविवार दिनांक 31 मार्च रोजी पहाटे ३:०० वाजता तहसील कार्यालय आवारातून चोरी केली असल्याचे कबूल केले आहे.हा आरोपी दाखल असलेल्या ३७९ गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याने चोरी केलेला १ लाख १२ हजार रुपये किमतीचा वाळूने भरलेला टेम्पो हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्पाज शेख, भारत पाटील, बापू साठे, दिलीप किरदिक, सुभाष मुंडे सैपन सय्यद, वसीम शेख, अविनाश पाटील, सतीश काटे,प्रकाश गायकवाड, मच्छिन्द्र राठोड यांनी केली आहे.