सोलापूर : मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील बार्शी,वैराग या भागातील जवळपास १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये बंद घराची कुलूपं तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून ५८ ग्रॅम सोन्याचे व २६० ग्रॅम चांदीचे दागिने असा ४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.राजाराम ऊर्फ बबन धोंडीराम बुधवाडे (रा बाभूळगाव,लातूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोलापूर, उस्मानाबाद, बुलढाणा व तेलंगना या ठिकाणी घरफोडीचे १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.सोलापूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने निंबाळकर यांनी आढावा बैठक घेऊन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलिस अंमलदार प्रकाश काटकर यांना गोपनीय माहिती मिळाली की वैराग येथील जामगांव गावातील मच्छिंद्र मस्के यांच्या घरातून १ लाख ३० हजार २३९ रुपयाचा मुद्देमाल यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणारा आरोपी राजाराम बुधवाडे आहे.सापळा रचून आरोपीला उचललेत्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी राजाराम ऊर्फ बबन धोंडीराम बुधवाडे हा वैराग बस स्थानकावर येणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने सापळा रचून बुधवाडे याला मोठया शिताफीने ताब्यात घेतले.
सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. घरफोडीच्या अनुषंगाने त्याची कसून चौकशी केली असता वैराग जामगांव येथील घरफोडी केली असल्याचे कबूल केले. त्याला विश्वासात घेऊन आणखी कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने मागील दोन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील शिवाजीनगर,दत्त नगर, घोंगडे प्लॉट,खरटमल प्लॉट, भालगाव तसेच बार्शी येथील व्हनकळस प्लॉट अलिपूर रोड,बारंगुळे प्लॉट, धस पिंपळगाव या ठिकाणाहून भरदिवसा बंद घराची कुलुपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली असल्याचे सागितले.दरम्यान, त्याच्याकडून सोन्याचे ५८ ग्रॅम आणि चांदीचे २६० ग्रॅमचे दागिने असा ४ लाख ४८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही विशेष कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, प्रकाश कारटकर,रवी माने, अजय वाघमारे, अन्वर आत्तार, सुरज रामगुडे, यश देवकते यांनी केली आहे.