MH 13 NEWS NETWORK
राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त औषध सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर बार असोसिएशन, धर्माधिकारी प्रतिष्ठान, डॉक्टर काकासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल, सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानाची सुरुवात सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. मनोज शर्मा साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. प्रशांत पेटकर साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री ओम प्रकाश पाटील, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे, सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो सेवक, न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन न्यायालय परिसर, परिसरातील रस्ते, कार्यालयीन भाग व सार्वजनिक जागांची स्वच्छता केली.

या उपक्रमामुळे सोलापूर जिल्हा न्यायालयाचा परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर व प्रसन्न झाला. राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाला कृतीतून साकार करत समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला .

या उपक्रमात न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. न्यायालय परिसर, आवारातील रस्ते, बागा व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेसोबतच प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी संत गाडगेमहाराजांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत, स्वच्छता ही केवळ एक दिवसापुरती न राहता दैनंदिन सवय व्हावी, असा संकल्प व्यक्त केला. या मोहिमेमुळे न्यायालय परिसर स्वच्छ व प्रसन्न झाला असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.








