mh 13 news network
लातूर : राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान आज एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे रवाना होण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने टेकऑफ होण्याआधीच ही चूक लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रस्थानापूर्वी नेहमीप्रमाणे हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात काही बिघाड आल्याचे सांगण्यात येत आहे. तत्काळ उड्डाण थांबवण्यात आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढील प्रवास तात्काळ स्थगित करण्यात आला.
या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात टळला. संबंधित हेलिकॉप्टरची सखोल तांत्रिक तपासणी सुरू असून बिघाड नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल मागवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून हेलिकॉप्टर देखभालीबाबत चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.








