MH 13news network
२५ शाळा-महाविद्यालयांना भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांवर थेट संवाद
माढा : प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी शिक्षकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. माढा तालुक्यातील जवळपास २५ शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या भेटींना शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. डॉ. रोंगे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. प्रेमलता रोंगे यांनीही शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एका जागेसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.
या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी गेल्या वर्षभरापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देण्यावर भर दिला आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात स्वेरीचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अशी डॉ. रोंगे यांची ओळख आहे.

स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या संस्थांच्या उभारणीतील त्यांचा अनुभव, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा अनुभव यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
मतदार नोंदणीपासून निवडणुकीच्या विविध प्रक्रियांपर्यंत शिक्षकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न डॉ. रोंगे यांनी केला आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५८ तालुक्यांतील शिक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांदरम्यान अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले असून काही शिक्षक संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.
सौ. प्रेमलता रोंगे यांच्याकडून शाळांना भेटी..
डॉ. रोंगे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सौ. प्रेमलता रोंगे यांनी गेल्या आठवड्यापासून शिक्षकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. माढा तालुक्यातील भेटीदरम्यान त्यांनी कुर्डुवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक व कला प्रशाला, लीड स्कूल आणि प्रगती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.तसेच बारलोणी येथील शरद विद्यालय, कव्हे येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, रोपळे येथील श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोगेवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, वडशिंगे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, म्हैसगाव येथील मातोश्री माध्यमिक विद्यालय आणि रिधोरे येथील न्यू इंग्लिश स्कूल यांसह अन्य शाळा-महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. या वेळी शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.या भेटीदरम्यान अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह डॉ. रोंगे यांचे समर्थक उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांवर संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, यावर या भेटींमध्ये भर देण्यात आला.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा..
सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न डॉ. बी. पी. रोंगे यांच्या पाठपुराव्यानंतर मार्गी लागल्याचे सांगण्यात येत आहे.सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून डॉ. रोंगे यांनी पाठपुरावा केला.
या प्रक्रियेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, नियुक्ती आणि सेवाविषयक अनेक प्रकरणे मार्गी लागल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर केलेल्या पाठपुराव्याची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, या उद्देशाने डॉ. रोंगे यांच्या भेटी सुरू आहेत







