MH13 News
महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत १४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांची सुविधा; ३० वर्षांवरील नागरिकांसाठी विशेष मोहीम..
#महेश_हणमे /सोलापूर
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान व्हावे, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत तपासणी, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जात आहे.

महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आयुष्मान आरोग्य मंदिर, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे या सुविधा उपलब्ध आहेत. प्राथमिक तपासणीत लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी पुढील निदानाकरिता १४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्याही मोफत केल्या जात आहेत.
या मोहिमेचा आतापर्यंत १९ हजार ९११ उच्च रक्तदाबाचे आणि १२ हजार १७१ मधुमेहाच्या रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच प्राथमिक तपासणीत कर्करोगाचा संशय आढळलेल्या ७५० रुग्णांना पुढील सखोल निदान आणि उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे.#महिनाभराची औषधे, नियमित तपासणीरुग्णांना साधारणतः एका महिन्याची औषधे दिली जातात. त्यानंतर दर महिन्याला त्यांचा पाठपुरावा करून आरोग्याची स्थिती तपासली जाते. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला, औषधोपचार आणि समुपदेशनही केले जाते.
#अशा आहेत आरोग्य केंद्रांच्या वेळा- सकाळी १० ते दुपारी १- सायंकाळी ४ ते ६
#अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठीही गृहभेटी..
महापालिकेच्या उपशामक आरोग्यसेवा (पॅलिएटिव्ह केअर) उपक्रमांतर्गत पक्षाघात, कर्करोग, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आणि अन्य दुर्धर आजारांमुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची घरी जाऊन काळजी घेतली जाते. विशेषतः दैनंदिन कामे करण्यास असमर्थ असलेल्या आणि आवश्यक काळजी घेणारे कोणी नसलेल्या रुग्णांना महापालिकेचे डॉक्टर, आशा स्वयंसेविका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गृहभेटी देतात. या भेटींमध्ये औषधोपचारासाठी मदत, वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन केले जाते.महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत साधारण उपशामक सेवेत ४६६, मध्यम स्वरूपाच्या सेवेत ५९५ आणि गंभीर स्वरूपाच्या सेवेत ११२ रुग्णांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. गरजेनुसार रुग्णांना जोडभावी पेठ येथील भौतिक उपचार केंद्रातही पाठविण्यात येते.
#एप्रिल २०२६ पासून लाखो औषधगोळ्यांचे वितरण#रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांना महापालिकेकडून नियमित औषधोपचारसोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत एप्रिल २०२६ पासून रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना विविध औषधांचे वितरण करण्यात येत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, अम्लोडिपिन २.५ मिलीग्रॅमच्या १९ हजार ८००, ५ मिलीग्रॅमच्या ७ लाख ४० हजार आणि १० मिलीग्रॅमच्या १९ हजार ५५० गोळ्यांचे वितरण झाले आहे.#याशिवाय अॅटेनोलॉल ५० मिलीग्रॅमच्या ८९ हजार ३४०, अॅस्पिरिन ७५ मिलीग्रॅमच्या ७६ हजार ५९६, ग्लिमेपिराइड १ मिलीग्रॅमच्या ७७ हजार ५०० आणि २ मिलीग्रॅमच्या १ लाख ९२ हजार ५०० गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
मधुमेहावरील मेटफॉर्मिन ५०० मिलीग्रॅमच्या ५ लाख ९२ हजार आणि १००० मिलीग्रॅमच्या १ हजार ३०० गोळ्यांसह रक्तदाबावरील टेल्मिसार्टन ४० मिलीग्रॅमच्या ६५ हजार ७०० गोळ्यांचेही वितरण करण्यात आले आहे.
हे आहे महत्त्वाचे |
सोलापुरात येथे मिळणार मोफत औषधोपचार व तपासणी
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, शहर परिसरातील नागरी आरोग्य केंद्रे आणि त्याअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये औषधोपचार व तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
सेवा उपलब्ध असलेली प्रमुख ठिकाणे :* बाळे* भावनाऋषी,कर्णिक नगर* दाराशा रुग्णालय, लष्कर* मजरेवाडी शाळा परिसर* नई जिंदगी परिसर* शेळगी विभाग* विडी घरकुल परिसर* मुद्रा सनसिटी* जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, जेलरोड* सोरेगाव गावठाण* देगाव* साबळे रुग्णालय, मिलिंद नगर* रामवाडी * जोडभावी पेठ प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत किमान चार ते पाच आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यरत असून, निर्धारित वेळेत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना साधारणतः एका महिन्याची औषधे दिली जातात. त्यानंतर दर महिन्याला तपासणी व पाठपुरावा करून पुढील औषधोपचार केले जातात. या सुविधेमुळे रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना नियमित उपचार मिळण्यास मदत होत आहे.
#नागरिकांना महापालिकेचे आवाहन..
उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान झाल्यास त्यांवर योग्य उपचार करणे आणि आजार नियंत्रणात ठेवणे शक्य होते. त्यामुळे ३० वर्षांवरील नागरिकांनी आपल्या जवळच्या महापालिका आरोग्य केंद्रात जाऊन नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केले आहे.








