MH13 News network
पुणे विभागातील शिक्षकांशी थेट संवाद; मिरज तालुक्यातील २२ शाळा-महाविद्यालयांना भेटीमिरज : प्रतिनिधीपुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जवळ आली असताना उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात शिक्षकांशी थेट संवाद साधताना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते शासनस्तरावर प्रभावीपणे मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे विभागातील शिक्षकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या समर्थकांकडून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) चे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी गेल्या वर्षभरापासून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये त्यांनी संपर्क अभियान राबविले आहे.मिरज तालुक्यातील आर. एम. हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूल, मिरज महाविद्यालय, कन्या महाविद्यालय, विद्या प्रशाला, बळवंतराव मराठे विद्यालय, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, विद्यादीप इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज आणि जुबली इंग्लिश स्कूल यांसह जवळपास २२ शाळा व महाविद्यालयांना त्यांनी भेटी दिल्या. या भेटींदरम्यान प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांशी संवाद साधून शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या.
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी, नियोजनबद्ध पाठपुरावा आणि ठोस भूमिका आवश्यक असल्याचे मत या संवादातून व्यक्त होत आहे. स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या संस्थांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांच्याकडून शिक्षकांना अपेक्षा आहेत. त्यांच्या भेटींना मिळणारा प्रतिसाद आणि विविध शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत असलेला पाठिंबा यामुळे त्यांच्या प्रचाराला बळ मिळत असल्याचे चित्र आहे.
टीईटी, जुनी पेन्शन योजनेसह प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा निर्धार..
शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, “आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी आणि समस्या आहेत. त्या शासनस्तरावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना यांसारख्या अनेक प्रश्नांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. हे प्रश्न यापूर्वीच सुटायला हवे होते; मात्र उदासीनतेमुळे ते प्रलंबित राहिले. शिक्षकांनी सेवा करण्याची संधी दिल्यास जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर हे प्रश्न सोडविण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही.”
शिक्षकांच्या प्रश्नांचा प्रत्यक्ष अभ्यास, शाळा-महाविद्यालयांना भेटी आणि विविध घटकांशी सातत्याने सुरू असलेला संवाद यामुळे डॉ. रोंगे यांच्या प्रचाराला गती मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढता प्रतिसाद त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे







