MH13 News network
अकलूजमध्ये महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा; रिक्त शिक्षक पदे, बेरोजगारीवरून सरकारवर हल्लाबोल
अकलूज, ता. १९ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून सत्तेच्या मस्तीत असलेल्या हुकूमशाही सरकारला धडा शिकवण्याची सुवर्णसंधी मतदारांसमोर आहे. सुशिक्षित तरुणांनी निर्भीडपणे पुढे येत मतदानाच्या माध्यमातून या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव या हर्षदारुपी दुर्गा बनून वाईटावर विजय मिळवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, मदनसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
शिक्षकांची पदे रिक्त, सरकारचे दुर्लक्ष..
राज्यात तब्बल अकरा हजार शिक्षकांची पदे रिक्त असतानाही सरकार डोळे झाकून बसले आहे, अशी टीका खासदार मोहिते-पाटील यांनी केली. विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत, या निवडणुकीच्या निकालातून अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले.

माळशिरस आणि परिसरात ऊस, डाळिंब, केळी यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र, या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारून स्थानिक तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी रोजगार, शेतीपूरक उद्योग आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विधिमंडळात ठामपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात रोजगार व मार्गदर्शन केंद्र उभारणार..
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. प्रत्येक पदवीधराच्या समस्या वेगवेगळ्या असून, तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी सरकार शिक्षण संस्थांना टाळे ठोकण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रोजगार व मार्गदर्शन केंद्र उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकजुटीचे आवाहनमेळाव्यात माजी आमदार रामहरी रुपनवर, ॲड. प्रकाश पाटील आणि शीतलदेवी मोहिते-पाटील यांनीही परखड भाषणांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. हरिभाऊ मगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकजुटीचे आवाहन..
मेळाव्यात माजी आमदार रामहरी रुपनवर, ॲड. प्रकाश पाटील आणि शीतलदेवी मोहिते-पाटील यांनीही परखड भाषणांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. हरिभाऊ मगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, पदवीधरांचा रोजगार आणि सरकारच्या कारभारावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याने अकलूजमधील राजकीय वातावरण तापले आहे. या मेळाव्यातून पदवीधर व शिक्षक मतदारांना एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.







