MH13 News Network
शहर उत्तर मधील बाळे भागातील राजेश्वरी नगर येथील तब्बल पंधरा वर्षानंतर सुरू केलेले पाईपलाईनचे काम केवळ दीड दिवसात ठप्प झाले असून रस्ताच अस्तित्वात नसल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे ना धड रस्ता.. ना पाईपलाईन अशी अवस्था झाली आहे.
बाळे भागातील राजेश्वरी नगर या भागात गेल्या पंधरा वर्षापासून चांगला रस्ता, पाईपलाईन अशी विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे येथील नागरिक, विशेषत: महिला आणि वाहनधारक त्रस्त असून आता तरी काम होणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून शाळेला जाणाऱ्या येणाऱ्या लहान मुलांपासून त्यांचे पालक, वृद्ध व्यक्ती,महिला वर्ग अक्षरशः वैतागलेला आहे.
काल सोमवारी महापालिकेच्या झोन मधील अधिकाऱ्यांनी तात्पुरती पाहणी करून या ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी मक्तेदार मिळत नसल्याचे सांगितले. तर पाईपच उपलब्ध नसल्यामुळे पाईप टाकण्याचे काम ठप्प झाले आहे. पाईपलाईनच्या कामावर निरीक्षण करणारा अधिकारी वर्ग या ठिकाणी येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. कार्यालयात बसून कामावर देखरेख केली जात असल्याने आमदारांनी दिलेल्या विकासकामाला खीळ बसली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्घाटन आणि बोर्ड लावून सुरू केलेले काम केवळ दीड दिवसात ठप्प झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. स्थानिक माजी नगरसेवकांनी सुद्धा या ठिकाणी काम केले नसल्यामुळे आता आमचा वाली कोण..? याचीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
स्थानिक माजी नगरसेवक, विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख , संबंधित खात्याचे अधिकारी आणि झोन अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन कामास गती द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.