MH 13News Network
विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील पराभवाचा वचपा काढा
खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक
सोलापूर
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पदाधिकार्यांनी विसरून जावे. आता दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. यासाठी पदाधिकार्यांनी सज्ज रहावे, जनतेत मिसळून त्यांची कामे करावीत आणि लोकसभेतील पराभवाचा वचपा काढावा, असे प्रतिपादन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी (प्रवासी नेता) खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक खा. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुभाष देशमुख यांची होती. यावेळी व्यासपिठावर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, हणमंत कुलकर्णी, राम जाधव, अर्जुन जाधव, आनंद बिराजदार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी खा. धनंजय महाडिक यांनी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकार्यांची मते जाणून घेतली. तसेच आगामी निवडणुकीची रणनीती काय असेल, याबाबत मार्गदर्शन केले. राज्य सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ यासह अनेक हिताच्या योजना सुरू केल्या आहेत. त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी. खास करून महिला पदाधिकार्यांनी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करावा. विरोधक खोटा प्रचार करत आहेत, हे जनतेला सांगावे. आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आ. देशमुख म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याची माहिती जनतेला करून द्यावी. दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याबाबत रणनिती आखावी. बुथ प्रमुख, पन्नाप्रमुखांनी याची जबाबदारी घ्यावी. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्चित पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रामप्पा चिवडशेट्टी, जगन्नाथ गायकवाड, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.