MH 13News Network
जादा दारु विक्री भोवली..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस. पी. वाईन्स हा वाईन शॉप परवाना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निलंबित केला आहे.सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, देशी दारू दुकाने, परमिट रूम व बियर शॉपी यांचेकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागविण्यात येतो. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील दारू दुकानाकडून प्राप्त झालेल्या दारुविक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस. पी. वाईन्स एफएल 2 क्रमांक 38 या वाईन शॉपमधून 17 मार्च रोजी मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी सदर दुकानाची 19 मार्च रोजी पडताळणी केली असता हिशेब नोंदवहीत मद्य विक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्यविक्री जास्त असणे इत्यादी विसंगती आढळून आल्याने सदर परवान्याविरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम 1953 अन्वये नियमभंग प्रकरण नोंदविण्यात आले. या प्रकरणात जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार 22 मार्चच्या आदेशान्वये एस. पी. वाईन्स या दुकानाचे व्यवहार 15 दिवसांकरिता निलंबित केले. त्या अनुषंगाने दुय्यम निरिक्षक सुखदेव सिद यांनी 22 मार्च रोजी सदर वाईन शॉप ला सील ठोकले आहे.
आवाहन..सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री परवानाधारकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करुन मदयविक्री करावी अशा सूचना देण्यात येत असुन निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडून मद्य विक्री परवान्यांची अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीविरुद्ध निलंबनाची किंवा अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे.