MH 13 News network
♦️ 37 सभा घेत 38 जागा जिंकत भाजपचा दमदार विजय
♦️ सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष
♦️ नगरपालिका, महापालिकेनंतर जिल्हा परिषदही भाजपच्या ताब्यात
सोलापूर : सगळ्यांचे राजकीय गणित कोलमडवून टाकत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ठोस नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली. अचूक नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि “शतप्रतिशत भाजप” या स्पष्ट राजकीय भूमिकेमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. जिल्ह्यात भाजप खोलवर रुजवण्याचा गोरे यांचा प्रयत्न प्रत्यक्षात यशस्वी ठरताना दिसत असून, त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
जिल्ह्यातील दोन खासदार आणि 11 पैकी सहा आमदार विरोधी पक्षाचे असतानाही, पालकमंत्री गोरे यांनी विरोधी आमदारांच्या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला ताकद देत संघटन मजबूत केले. संपूर्ण जिल्ह्याची प्रचाराची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सभा, गाठीभेटी, रॅली आणि संघटनात्मक बैठका असा तब्बल 18 तासांचा प्रचार त्यांनी सातत्याने केला.
जिल्ह्यात त्यांनी तब्बल 37 जाहीर सभा घेतल्या. स्वतःच्या मान-खटाव मतदारसंघात कमी वेळ देता आल्याने काही प्रमाणात राजकीय नुकसान सहन करावे लागले, मात्र सोलापूर जिल्ह्यातील विजयासाठी त्यांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले. जिल्हा परिषदेची ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्यक्षपणे एकहाती लढवत, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक केंद्रित केली आणि विरोधकांचा आवाज क्षीण करून टाकला.
केंद्र व राज्यात असलेली भाजपची सत्ता जिल्ह्याच्या विकासासाठी कशी फायदेशीर ठरेल, हे प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात गोरे यांना यश आले. “जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर झेडपीवर भाजपची सत्ता आवश्यक आहे” हा मुद्दा ठामपणे मांडत त्यांनी विरोधकांना राजकीय कोंडीत पकडले.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपला जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळाली आहे. 68 पैकी 59 जागा लढवून 38 जागांवर भाजपने विजय मिळवला, यावरून पालकमंत्री गोरे यांचा जिल्ह्यातील वाढता दबदबा सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून स्पष्ट झाला.

नगरपालिका, महापालिकेनंतर झेडपी व आठ पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात
• नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सर्वाधिक 131 नगरसेवक भाजपचे निवडून आले, तर चार नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले.
• त्यानंतर सोलापूर महापालिका निवडणुकीत 102 पैकी 87 नगरसेवक भाजपचे निवडून येत महापालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली.
• या दणदणीत विजयानंतर जिल्हा परिषदेतही 68 पैकी 38 सदस्य भाजपचे निवडून आले.
• 11 पैकी तब्बल 8 पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आल्या.
• जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झेडपीत भाजपचा अध्यक्ष होणार आहे.
शतप्रतिशत भाजप! विधान परिषद, लोकसभा व विधानसभेत राजकीय फायदा..
नगरपालिका आणि महापालिकेनंतर भाजपने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला यश मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गोरे, भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.


जिल्ह्यात भाजपची संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यात आली. त्याचेच फलित म्हणून जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. या विजयाचा राजकीय फायदा येणाऱ्या विधान परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.







