MH 13 NEWS NETWORK
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध
-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटी 20 लाख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात 481 कोटीचा धनादेश देण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न, 40 हजार महिला लाभार्थ्यांची तर 550 महिला सरपंचाची उपस्थिती लक्षवेधक
सोलापूर, राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणांचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणी शिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, श्री. शिवाजी सावंत, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलै चे प्रति महा पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेविषयी कोणी कितीही काही सांगितले तरी आम्ही ही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासन ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात 25 लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले
राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी 3 हजार 366 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरून सौर पंप बसवून देण्यात येणार असल्याने पुढील 25 वर्ष विजेचा खर्च शेतकऱ्यांना येणार नाही. तसेच मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफी, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच मुलीच्या नावावर शासन पैसे टाकत आहे, एसटी बस मध्ये महिलांना तिकीटामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध
-उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. ही योजना बंद पडणार नाही आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळात ही योजना अशीच चालू राहील. तसेच उपसा सिंचन योजनेचे सौरऊर्जीकरण करण्यात येत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्र निर्मितीमध्ये महिलांचे स्थान व योगदान खूप मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.
राज्य शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली तसेच तांदूळ निर्यात बंदी ही उठवली आहे. दुधाला सप्टेंबर 2024 मध्ये पाच रुपये प्रति लिटर वाढ देण्यात आलेली होती त्यात 7 रूपये वाढ करून प्रतिलिटर 35 रुपये दुधाचा भाव ठरवून देण्यात आलेला आहे. शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. पोलीस पाटील व कोतवाल यांचे मानधन दुप्पट करण्यात आले. अशा सेविका, गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली. सरपंच, उपसरपंचाचे मानधनात ही दुप्पट वाढ करण्यात आली. अशा प्रकारे हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा लाख 70 हजार महिलांचे अर्ज प्राप्त झालेले असून सात लाख दोन हजार महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या योजनेचा उद्देश सांगून त्यांनी जिल्हा प्रशासनाने ही योजना राबवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री महोदय यांची अचानक तब्येत ठीक नसल्याने तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हा प्रशासनाने माझी लाडकी बहीण योजना व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपसा सिंचन योजना तसेच अन्य योजनेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली चित्रफितीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
उपसा जलसिंचन योजनांच्या सौरऊर्जीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
राज्यातील 242 शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी 2 हजार 773 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
लाडक्या बहिणींना धनादेश वाटप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण 481 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात 15 महिला लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रशासनाच्या वतीने नेटके आयोजन-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा समारंभाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत नेटके आयोजन करण्यात आलेले होते. जवळपास 40 हजार महिलांना त्यांच्या गावातून ने – आण करण्यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. पार्किंगची व्यवस्था, महिलांना जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आलेली होती. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक बाबींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून स्वतःच्या नियंत्रणाखाली सर्व कामे व्यवस्थितपणे करून घेत असल्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलेला आहे.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा सत्कार-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी खूप मेहनत घेतलेली होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही त्यांनी प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून हा कार्यक्रम यशस्वी केला. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याप्रमाणे महापालिका क्षेत्रात या योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली उगले, तर ग्रामीण भागात चांगले काम केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार-
सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या गृहप्रकल्पाला राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सात कोटीचा निधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.