महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाची १५२ वी बैठक
MH 13 NEWS NETWORK
मुंबई : शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाची सभा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. सदर बैठकीमध्ये पणन मंत्री श्री. सत्तार यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळातर्फे बापगाव, काळडोंगरी, छत्रपती संभाजीनगर तळेगाव दाभाडे तसेच सिल्लोड श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. याशिवाय काजू बोर्ड, आंबा बोर्ड, शासन अनुदानित नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे उभारण्यात येणा-या संत्रा प्रकल्पांचे कामकाज याचा आढावा घेण्यात आला. आंबा उत्पादकांसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधूरत्न योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कुलिंग व्हॅन, स्मार्ट प्रकल्पातून निर्माण करण्यात येणाऱ्या पणन विषयक सुविधा, ई-नाम योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १५ बाजार समित्यांबाबत ई- नाम योजनेनुसार पुढे करावयाची कार्यवाहीबाबत सद्यस्थितीची माहिती श्री.सत्तार यांनी यावेळी दिली.
सिल्लोड तालुक्यातील उत्पादित होणाऱ्या मिरचीचे उत्पादन व गुणवत्ता विचारात घेऊन तेथे मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावे, दोन जिल्हा मिळून पणन मंडळाचे एक उपविभागीय कार्यालय करावे, तळेगाव दाभाडे येथील प्रक्षेत्रावरील कव्हेंशन सेंटरचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच तळेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल लिलाव केंद्र निर्माण करावे, अशा सूचना श्री.सत्तार त्यांनी यावेळी दिली.
सदर बैठकीस पणन मंडळाचे संचालक प्रवीण कुमार नहाटा, चरणसिंग ठाकूर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी भवेश कुमार जोशी, कार्यकारी संचालक संजय कदम आदी उपस्थित होते