‘आधुनिक पत्रकारिता: आव्हाने आणि संधी’ कार्यशाळेत मार्गदर्शन
सोलापूर : आज माहितीचा पूर आहे आणि अशा स्थितीत खरी, वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे पत्रकारासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली असून, स्थानिक पातळीवरील बातम्यांना जागतिक व्यासपीठ मिळत आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्र संकुल, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते.
सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे, दै. लोकमत सोलापूरचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, दै. पुढारीचे सहायक निवासी संपादक संजय पाठक , श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नीलेश झालटे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील सद्यस्थिती, बदलती आव्हाने आणि नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधींवर सखोल प्रकाश टाकला.आजच्या वेगवान डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप कसे बदलत आहे, यावर झालटे यांनी विशेष भर दिला.
यावेळी मिलिंद कुलकर्णी म्हणाले, जुनी व नवी पत्रकारिता असे भेद नसावेत. पत्रकारिता ही बोलीभाषेत केली पाहिजे. काळानुसार पत्रकारितेच्या संसाधनात बदल होतात. ते बदल पत्रकारांनी स्वीकारले पाहिजेत. स्थानिक बातम्यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक निवासी संपादक संजय पाठक म्हणाले, इशू बेस्ड पत्रकारिता गरजेचे आहे. आधुनिक पत्रकारितेत अनेक संधी असल्या तरी पत्रकारांनी अपग्रेड आणि अपडेट राहिले पाहिजे. नाविन्य पूर्ण पत्रकारिता केली पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के म्हणाले, वाचन संस्कृती अधिक विकसित करणे गरजेचे आहे. वाचन कौशल्यातून शब्दसंग्रह वाढतो. त्यातूनच प्रभावकारी बातमी लोकांपर्यंत पोहोचवता येते. काळानुसार पत्रकारांनी बदल आत्मसात केले पाहिजेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल एडके यांनी केले.