महेश हणमे /9890440480
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला आरक्षणाची दरवाजे खुली झाली आहेत. संपूर्ण राज्यात हजारोंच्या संख्येने कुणबी दाखले मिळत असून महाराष्ट्र शासन आणि प्रशासन वेगाने कुणबी दाखले शोधून काढण्याच्या कामी प्रयत्नशील आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे जिल्ह्यातील माढा तालुक्यातील 38 गावांमध्ये मोडी लिपीतील तब्बल 9900 नोंदी सापडल्या आहेत.यामध्ये वेगाने प्रगती होत आहे.
विशेष म्हणजे माढा या ठिकाणी केवळ 14 ते 15 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शहरातील केवळ एकाचीच नोंद सापडली असल्याची मोठी चर्चा माढा शहरात सुरू आहे. जिल्हा परिषदेतील शाळेत मोजक्या 14 ते 15 कुणबी नोंदी सापडल्यामुळे प्रशासनाविषयी मोठी नाराजी समाज बांधवांमध्ये पसरली होती.
ही आहे सत्य परिस्थिती ..
माढा, करमाळा ,बार्शी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वाधिक कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. माढ्यातील महसूल विभागाच्या माध्यमातून वेगाने काम सुरू असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार विजय लोकरे, पांडुरंग भडकवाड कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश मिळत असून महसूल विभागातील 118 गावांपैकी 38 गावांची मोडी लिपीतील कागदपत्रांची पाहणी जवळपास पूर्ण झाली आहे. यातून तब्बल 9900 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. दररोज वेगाने काम सुरू केले असून सद्यस्थितीला बारा ते तेरा हजार कुणबी नोंदी मिळू शकतात. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
लिप्यांतरकार यांचे मोलाचे सहकार्य
मोडी लिपीतील कुणबी नोंदी तपासण्यासाठी अभ्यासू लिप्यांतरकार यांची गरज महत्त्वाची होती. माढ्यातील तहसील विभागाला या कामी विलास कोठावळे, प्रगती पाटील यांचे सहकार्य मिळत आहे. कामांचा वेग वाढण्यासाठी कर्जत येथील आल्हाट व नगरचे आव्हाड यांची अधिकची मदत घेतली जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय लोकरे यांनी दिली.
कुणबी प्रमाणपत्रासाठी नेमकं काम चालते कसे..
मराठा समाजातील व्यक्तीचा अर्ज, मोडी लिपीतील कुणबी नोंद असल्याचा पुरावा, लिप्यांतरकराचे भाषांतराची कॉपी, यासोबत त्या व्यक्तीची वंशावळ प्रतिज्ञापत्र, वंशावळ सिद्ध करणारे महसुली व इतर पुरावे असा प्रस्ताव सेतूकडे येतो. सेतू कार्यालय प्रत्येक गावामध्ये आहे. त्यातून प्रस्ताव आल्यानंतर मंडल अधिकाऱ्याकडून गृह चौकशी होऊन तो प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे छाननीसाठी येतो. त्यानंतर त्यावर नोडल अधिकाऱ्यांची टिप्पणी ठेवून मंजूरीसाठी प्रांताकडे पाठवला जातो. प्रांताधिकार्यांची मंजुरी आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने कुणबी दाखले दिले जातात.
आजपर्यंत 617 कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण
माढा तालुक्यातील महसूल विभागाच्या माध्यमातून 617 कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.
6 सप्टेंबर 2023 पासून आजपर्यंत शेकडो जणांना याचा लाभ मिळाला आहे. आज शुक्रवारी शंभरहून अधिक जणांच्या कुणबी प्रमाणपत्रावर सह्या करण्यात आले असून प्रांताधिकारी यांच्याकडे साधारण 300हून अधिक कुणबी दाखले आहेत. तेही लवकरात लवकर मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तहसील कार्यालयमध्ये कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून नोडल अधिकारी म्हणून श्री.विजय लोकरे आणि श्री.पांडुरंग भडकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कुणबी दाखल्याची मागणी केल्यानंतर विना विलंब निर्गती केली जाते . परांडा येथे काही कुणबीच्या नोंदी सापडत असून सापडत असून त्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे.
विनोद रणवरे,
तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी
माढा तालुक्यातील 38 गावांची नावे.. याच ठिकाणी पुढील भागात… नक्की वाचा आणि शेअर करा..