सोलापूर (प्रतिनिधी):
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात आज पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. सेंट्रल टेक्सटाइल मिल या टॉवेल कारखान्यात शनिवारी (दि. १७ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तिघा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत आणखी चार ते पाच कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, पोलीस व महसूल प्रशासनही घटनास्थळी बचावकार्य करत आहे. याशिवाय कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय येथून शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
या कारखान्याचे मालक तिथेच वास्तव्यास असल्याची माहिती असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे सहकार्य:
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून, स्थानिक नागरिक प्रशासनाला मदत करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह:
या दुर्घटनेनंतर कारखान्यातील अग्निसुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेचा सखोल तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.