छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुनरागमन: अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता
मुंबई, २० मे २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी १० वाजता मुंबईतील राजभवनात राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ५० निमंत्रित उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळ यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. या खात्याची जबाबदारी यापूर्वीही त्यांनी सांभाळली होती.
भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनामुळे नाशिक जिल्ह्याला चौथे मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी दादा भुसे (शिवसेना), माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस) हे मंत्री आहेत.
पालकमंत्री पदासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता..!
भुजबळ यांच्या समावेशामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे .
भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावी नेते आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे महायुती सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मदत होऊ शकते .
भुजबळ यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून १,३४,१५४ मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता .
भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनामुळे महायुती सरकारला स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे .
ज्याचा शेवट चांगला त्याचं सारं चांगलं..!
आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा निर्णय हा आठ दिवसापूर्वी झाला होता. मंगळवारी कॅबिनेट बैठक असते त्यामुळे आज शपथविधी होणार आहे. ज्याचा शेवट चांगला त्याचं सारं चांगलं.. असेही ते म्हणाले.
राज्य सरकारांचे त्यांनी आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा, यांच्यासह कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
नाशिक मध्ये त्यांच्या कॅबिनेट मंत्री पदाबाबत अभिनंदनाचे फ्लेक्स झळकण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून अनेक ठिकाणी बॅनर लावले जात आहेत.
#ChhaganBhujbal#भुजबळशपथविधी#NCP#AjitPawar#महाराष्ट्रराजकारण#MaharashtraPolitics#OBCLeader#MahaYuti#कॅबिनेट #राजभवनमुंबई