MH 13 News Network
राज्यातील विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आमदार जय्यत तयारीनिशी सज्ज असतात. विविध विकासकामांना गती,मंजुरी, निर्णय याच दरम्यान होत असतात. अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहरात दाखल झाले असून आजच त्यांनी श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. आमदार देशमुख शहरात आल्यामुळे बाळेकरांना समस्या दूर होण्याची अशा निर्माण झाली आहे.
सोलापूर उत्तरमधील बाळे भागातील काही नगरांच्या समस्या या जैसे थे अशा आहेत.शिवशक्ती नगर(शिवाजी नगरच्या जवळील )बाळे या ठिकाणी सुद्धा मागील दोन ते तीन वर्षापासून पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक ,लहान मुले यांना चिखलातून वाट शोधत जावं लागत आहे. या ठिकाणी कमी लोक वस्ती असल्याने दुर्लक्ष केले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
भर बाळे चौकातील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तात्पुरती विकास कामे झाल्यानंतर पुन्हा तेथील रस्त्याचे काम नीट केले नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, बाळे भागातील राजेश्वरी नगर येथे रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. मागील पंधरा वर्षापासून येथे विकासकामे झाली नसल्याने ना धड रस्ता ना धड पाईपलाईन अशी अवस्था आहे. पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्याची येथील नागरिकांची नेहमीच तक्रार असते. गेल्या पाच वर्षात सुद्धा स्थानिक माजी नगरसेवकांनी व स्थानिक आमदार देशमुख यांनी या ठिकाणी काम केलेले नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनचे कामाचे उद्घाटन आणि बोर्ड लावण्यात आला. निवडणुकीत संपल्या, निकाल लागले, आचारसंहिता संपली त्यानंतर ही कामे सुरू झाली नाहीत.
स्थानिक नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या दोन दिवसापासून येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले होते. परंतु एकाच कॉलनीत एका ठिकाणी सहा इंची आणि दुसऱ्या ठिकाणी चार इंची पाईप टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. जागरूक नागरिकांनी या संदर्भात आवाज उठल्यानंतर पंधरा वर्षानंतर सुरू केलेले काम केवळ दीड दिवसात ठप्प झाले.
यावर महापालिका प्रशासनाची संपर्क साधला असता या ठिकाणी जागेवर अधिकारी पाहणी करण्यासाठी येत नसल्याने नेमके काम कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती मिळाली नाही. अखेरीस महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित खात्याला योग्य ते आदेश देऊन जनसामान्यांच्या तक्रारी दूर करण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्यावर जागेवर जाऊन मेजरमेंट घेऊन पाईपलाईन संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून पाईपलाईनचे काम सुरू असून त्यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन नागरी सुविधापासून वंचित नगरांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. सद्यस्थितीत पाईपलाईनचे काम जागेवर ठप्प आहे तर या ठिकाणी रस्ताच नसल्याने पावसामुळे प्रचंड प्रमाणावर चिखल झाला आहे. यातून लहान शाळकरी मुले,महिला, अबालवृद्ध आणि वाहनधारक वाट काढत असून अनेक जण या ठिकाणी चिखलात घसरून पडलेले आहेत.
आमदार देशमुख शहरात दाखल झाल्याने या भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने दूर होतील अशी आशा स्थानिक नागरिकांना लागलेली आहे.