MH 13 News Network
शहरातील जुना पुना नाका येथे एक महिलेचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे ,वय वर्षे 33 असे या महिलेचे नाव असून आज शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सदर महिला ही पुणे नाका येथील स्मशानभूमी शेजारी एका झोपडीत राहत होती. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले आहेत. अशी माहिती त्यांच्या आईने दिली.
चेंबर उघडे असल्याने कांबळे यांचा मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा काम झालं नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी तसेच मृताच्या नातेवाईकाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.
मंगल कांबळे या महिला ड्रेनेज चेंबरमध्ये साधारण दुपारी बारा ते एकच्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला समजली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या कामावर प्रत्यक्ष देखरेख केल्यास अशा प्रकारच्या गंभीर चुका घडणार नाहीत अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.